‘डीएड’ आता कायमचे बंद! शिक्षक होण्यासाठी ४ वर्षांची ‘बीएड’चीच घ्यावी लागणार पदवी
सध्याच्या प्रचलित शैक्षणिक पद्धतीत झेडपी शाळांवरील (प्राथमिक) शिक्षक होण्यासाठी बारावीनंतर दोन वर्षाचे डीएड करावे लागते. तर माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांवरील शिक्षकांसाठी ‘बीएड’ बंधनकारक आहे. मात्र, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक होण्यासाठी आता बारावीनंतर चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात शिक्षणशास्त्र विषय घेऊन विद्यार्थ्यांना ‘बीएड’च करावे लागणार आहे. त्यात स्पेशलायझेशन असणार आहे.
ॲकॅडमिक कौन्सिलने देखील त्यास मान्यता दिली असून प्राध्यापकांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची ५ एप्रिलला बैठक होणार असून त्यात नवीन शैक्षणिक धोरणावर शिक्कामोर्तब होणार आहे. बारावीनंतर नव्याने पदवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पॅटर्न लागू असणार आहे. सध्या शिकत असलेल्यांना हा पॅटर्न लागू असणार नाही.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार…
- – तीन वर्षाची पदवी आता चार वर्षांची होणार आणि त्यानंतर थेट ‘पीएचडी’ करता येईल.
- – विषय निवडीसाठी विद्यार्थ्यांना स्वातंत्र असणार असून एखाद्या अभ्यासक्रमाचा विद्यार्थी दुसरा विषय घेऊ शकतो.
- – एका वर्षानंतर सर्टिफिकेट मिळेल, दोन वर्षानंतर डिप्लोमाचे प्रमाणपत्र तर तीन वर्षानंतर पदवी प्रमाणपत्र मिळणार.
- – चार वर्षे झाल्यावर डिग्रजी विथ ऑनर्स किंवा डिग्री विथ रिसर्च मिळणार; ‘रिसर्च’ घेतले तरच ‘पीएचडी’ करता येईल.
- – पाच वर्षे पूर्ण केल्यावर पदव्युत्तर पदवी मिळेल आणि गॅप पडला तरीदेखील दोन-तीन वर्षांनी प्रवेश घेता येतो.
- – परीक्षेची सत्र पद्धती कायम असणार, पण ‘सीबीसीएस’ पॅटर्ननुसार टक्केवारी नव्हे ग्रेडेशन (स्कोअर क्रेडिट) पद्धती असणार.
सध्याच्या शैक्षणिक धोरणानुसार, तीन वर्षांची पदवी पूर्ण करण्यासाठी पाच वर्षांची कालमर्यादा ठरलेली आहे. पण, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सात वर्षांचा काळ विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. दरम्यान, ‘पीजी’ केलेल्या विद्यार्थ्यांना एक वर्षात बीएड करता येईल. तर पदवी घेतलेल्यांना दोन वर्षे तर बारावीनंतर बीएडसाठी चार वर्षे लागणार आहेत. नवीन धोरणात ‘डीएड’ नाही. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक होण्यासाठी ‘बीएड’च करावे लागणार आहे. पण, विषय निवडताना कोणता शिक्षक व्हायचा, त्यावरून विषय घेता येणार आहेत.